गोनीदा दुर्गप्रेमी मंडळाचे एक शिबिर दि. २४, २५ एप्रिल २०१० रोजी (शनिवार, रविवार) आयोजित करण्यात आले होते. पुणे-सिंहगड मार्गावरील डोणजे गावाजवळ, निसर्गरम्य नंदनवन सोसायटीतील श्री. जयप्रकाश सुराणा यांच्या बंगल्यात शिबिर पार पडले. सौ. वीणा व विजय देव, निनाद बेडेकर, शेखर नानिवडेकर, डॉ. जयंत नवरंगे, आनंद देशपांडे, अभिजित बेल्हेकर, मोहन शेटे, रमेश आपटे, स्नेहा आपटे, कुलदीप देसाई, पांडुरंग बलकवडे, रवि यादव, मनोज भांगरे, धनंजय मदन, मंदार कर्वे, श्रध्दा तिसगावकर, मुकुंद गोंधळेकर, या षिबिरात सहभागी झाले होते.
गोनीदा दुर्गप्रेमी मंडळाची औपचारिक स्थापना करण्याबाबत चर्चा करण्यात आली. गोनीदा दुर्गप्रेमी मंडळाची घटना तयार करून सोसायटीज रजिस्ट्रेशन अधिनियमाखाली व आवश्यक असल्यास पब्लिक ट्रस्टस अधिनियमाखाली नोंदणी करावी असे ठरविण्यात आले. याबाबतचे काम आनंद देशपांडे, शेखर नानिवडेकर व रवि यादव हे करतील.
२०११ चे दुसरे दुर्गसाहित्य सम्मेलन राजमाची येथे जानेवारीमध्ये आयोजित करावे तसेच राजमाची येथे विद्यार्थी व युवा वर्गासाठी शिबिरे आयोजित करावी असेही ठरविण्यात आले.
शनिवार दि. २४ एप्रिल २०१० रोजी रात्री डॉ. जयंत नवरंगे (बालरॊग तज्ञ) याचे उदबोधक व्याख्यान झाले. आरोग्याची काळजी घेण्यासाठी आहार, दिनचर्या, व्यायाम याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
निनाद बेडेकर यांनी अलिकडेच ६१ व्या वर्षात पदार्पण केले व त्यानिमित्ताने त्यांनी वर्षभरात ६० पेक्षा जास्त दुर्गांना भेटी दिल्या. याबद्दल रविवार दि. २ एप्रिल २०१० रोजी सकाळी सिंहगडावरील गाडी तळावर निनाद बेडेकर यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी केलेल्या भाषणात निनादरावांनी कवि भूषणाची ओळख करून दिली व त्याच्या काव्यातील सौंदर्य स्थळे विषद केली. कवि भूषण व त्याचे काव्य यावर निनाद बेडेकर एक ग्रंथ लिहित आहेत. सदर ग्रंथ लवकरच प्रसिध्द होईल असे आश्वासन निनादरावांनी यावेळी दिले. गोनीदा दुर्गप्रेमी मंडळाच्या शिबिरात सहभागी झालेल्यांव्यतिरिक्त सिंहगडावर रविवारी सकाळी येणारे अनेकजण या सत्कार समारंभाला उपस्थित राहिले.
या कार्यक्रमांची क्षणचित्रे पाहाण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर कृपया क्लिक करा.
http://picasaweb.google.co.in/goneeda.durgapremi/dJVkbJ#