'गो.नी.दां' दुर्गप्रेमी मंडळ आयोजित दुसरे दुर्गसाहित्य सम्मेलन शनिवार दि. ५ व रविवार दि. ६ फेब्रुअरी २०११ रोजी निसर्गरम्य परिसरातील इतिहासकालीन राजमाची किल्ल्यावर संपन्न होत आहे. या सम्मेलनाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत प्रा. डॉ. ब्रम्हानंद देशपांडे. सुप्रसिध्द कला दिग्दर्शक नितिन चंद्रकांत देसाई या सम्मेलनाचे उदघाटक म्हणून उपस्थित राहाणार आहेत. स्वागताध्यक्ष आहेत केंद्र शासनाचे वैद्न्यानिक सल्लागार श्री. रवींद्र अभ्यंकर.
फेब्रुअरी २००९ मध्ये राजमाची येथे आयोजित केलेल्या पहिल्या दुर्गसाहित्य सम्मेलनाचे अध्यक्ष माननीय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, स्वागताध्यक्ष श्री. शेखर नानिवडेकर व पहिल्या दुर्गसाहित्य पुरस्काराचे मानकरी प्रा. प्र. के. घाणेकर हेही द्वितीय दुर्गसाहित्य सम्मेलनात उपस्थित राहाणार आहेत.
दि. ५, ६ फेब्रुअरी २०११ च्या द्वितीय दुर्गसाहित्य सम्मेलनात सु्प्रसिध्द दुर्गसाहित्यिक श्री. आनंद पाळंदे यांना दुसरा दुर्गसाहित्य पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
वर उल्लेख केलेल्या मान्यवरांव्यतिरिक्त इतर अनेक दुर्गप्रेमी व निसर्गप्रेमी साहित्यिक (पांडुरंगराव बलकवडे, आनंद देशपांडे, मोहन शेटे, कुलदीप देसाई, उष:प्रभा पागे, डॉ. विजय देव, डॉ. वीणा देव, अभिजित बेल्हेकर, डॉ. संदीप श्रोत्री, वगैरे) दि. ५, ६ फेब्रुअरी २०११ च्या सम्मेलनात उपस्थित राहाणार आहेत.
या दोन दिवसांच्या सम्मेलनात स्वागताध्यक्ष, उदघाटक व सम्मेलनाध्यक्ष यांची भाषणे, दुर्गांसंबंधी विषयांवर परिसंवाद, दुर्गविषयक प्रश्णमंजुषा, दुर्गमहात्म्य या विषयावर कीर्तन, काही पुस्तकांचे प्रकाशन . . . असा भरगच्च कार्यक्रम कार्यक्रम आखलेला आहे.
सुप्रसिध्द चित्रकार श्री. भास्कर सगर यांनी जलरंगात चितारलेल्या दुर्गचित्रांचे प्रदर्शन तसेच दुर्गविषयक पुस्तकांचे विक्रीकेंद्र या सम्मेलनाच्या बाजूला असेल.
सम्मेलनात सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी सुरु झाली आहे. प्रवेशशुल्क प्रत्येकी रुपये पाचशे आहे. नाव नोंदणीसाठी अर्जाचे फॉर्म्स मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, महाड, वगैरे शहरातील काही दुर्गप्रेमींकडे उपलब्ध आहेत.
नाव नोंदणीसाठी अर्जाचा फॉर्म व सूचना इंटरनेटवरऊन घेता येईल मराठी भाषेतील फॉर्म व सूचना यांच्या PDF Files खालील लिंकवर मिळतील. त्या उतरवून घेऊन त्यांचे प्रिंट्स काढावे.
नाव नोंदणीसाठी अर्जाचा फॉर्म
राजमाचीसारख्या दुर्गम ठिकाणी हे सम्मेलन आयोजित केले असल्यामुळे सम्मेलनात सहभागी होणाऱ्यांची संख्या मर्यादित ठेवावी लागणार आहे. निराशा टाळण्यासाठी कृपया त्वरित नाव नोंदणी क्ररावी.